Sunday, 18 June 2017

आज फादर्स डे ....
  बाबांसाठी.. बाबांबद्दल काय आणि कसे लिहावे... फारसे व्यक्त केलं जातं नाही ते यादिवशी सांगायची संधी आहे
बाबा  म्हणलं की माझ्याच कुटुंबातले जवळून अनुभवता आलेले सगळेच बाबा लोक मला आठवतात .. माझे आजोबा,  माझे बाबा आणि आता माझ्या लेकीचा अरे बाबा..
आज   तुम्ही सगळे अवतीभोवती असल्याने मी भाग्यवान आहे हे  शब्दही माझ्या मनातलं सगळ व्यक्त करायला पूरे पडणार नाहीयेत.
माझे बाबा ..  कर्तबगार,अत्यंत हुशार ,वाचनप्रिय,ओघवते वक्तृत्व, प्रामाणिकपणा,रुबाबदार व्यक्तिमत्व,अजून खूप काही ...  आमच्याबरोबर बऱ्याच लोकांना माहीत असलेल्या ह्या बाजू  ग्रेट आहेतच...
 पण माझ्यासाठी तरी ते घरात आल्यानंतर फकत आमचे बाबा म्हणून  आमच्यासाठी  असायचे   तेच बाबा साहजिकच खूप जास्त जवळचे वाटतात.   .
...बाबा,मी आणि माझी बहिण ...आजसारखं अगदी हायफाईव देण्याइतपत  मोकळेपणा नव्हता ..पण कधीतरी गम्मत म्हणून आईला चिडवण्याच्या कटात सामील होण्याचा मिश्कीलपणा नक्कीच होता.आई  तुला  नाही आमची गम्मत सांगणार असे म्हणले तरी आई कौतुकाने का हसायची ते आज समजतं.
रात्री दमून आले तरी स्कुटर वरून  कॉलनीला फेरी मारणारे, पत्त्यांच्या डावात मुद्दाम हरणारे, खेळतांना  क्रिकेटच्या बॅट चा शॉवर आणि पेपरवेट चा साबण  खरा मानून आंघोळ घालून घेणारे .. खऱ्या पावडरचा शिंपडा झाल्यावर मात्र आईची प्रतिक्रिया  काय येते हे पाहताना हसणारे,शाळेच्या  गॅदरिंग मधला नाच , गर्दीत उभे राहून पाहणारे,सायकल पोहणे शिकवताना .. कडक वागणारे.. नंतर बाईक शिकवताना मागे मागे अक्षरशः पळणारे..  अश्या त्यांच्या कितीतरी  आठवणींमध्ये आजही रमणे छान वाटते
आमचा अभ्यास ,आमच्या आवडीनिवडी, खेळ यामध्ये आमच्या बरोबर नेहेमी असणारे, गोष्टी सांगणारे,बाबा संध्याकाळची रामरक्षा शुभंकरोती म्हणले ना हे ही आठवणीने विचारायचे.  असे म्हणतात की संस्कार केले जात नाहीत ... होतात.. ,असे लहानपणीच  त्यांच्या वागण्यातून आमच्यावर होत गेलेले संस्कारच आहेत की जे आजही एखादी चुकीची गोष्ट करण्यापासून परावृत्त करतात.
संपन्न परिस्थिती असूनही उधळमाधळ न करता राहणं त्यांनी शिकवलं,  योग्य ठिकाणी स्पष्टवक्तेपणा .. पण त्याचवेळी आपल्या लोकांसाठी नमते  घेणं... अश्या एक ना अनेक कितीतरी गोष्टी  त्यांनी शिकवल्या ज्यामुळे आज  अडचणी आल्या  तरी त्या पार करणे सोपे झालंय..
आजही  माझ्या लग्नाला बऱ्यापैकी  वर्ष पूर्ण झाल्यावरही त्यांची  ...  छान झालाय हं सगळं ही  शाबासकी  अजूनपण लहानपणासारखाच आनंद  देते ..आजही अवघड  प्रसंगांमध्ये  महत्वाच्या निर्णयामध्ये मी आहे तू काळजी करू नको म्हणणारे बाबा ... मला मागे वळून पहावासही वाटत नाही इतके त्यांचे असणे गृहीत धरते त्यामुळेच की काय
 त्यांच्या वाढत जाणाऱ्या वयाची जाणीव अजूनही मन मान्य करत नाही...
आज जितके आठवावे तितके कमीच...
आज प्रकर्षाने मला  एक उणीव मात्र नक्कीच भासते ,,ती म्हणजे सासर्यांची... लग्न झाल्यापासून  श्रीकांतची सून का... वा..  राजामाणूस... हे ऐकत आलेय... खूप हौशी, मनमिळाऊ ,दांडगा जनसंपर्क असणारे,दिलदार  होते ...हे सगळे फकत ऐकत आलेय ... सून म्हणून नात्यांचे सगळे पैलु अनुभवले ... पण त्यांचं हे असे  असणे नाही अनुभवता आलं ...
आजही तुमची सून म्हणून  ओळखले जाणे हे  तुमच्या आशीर्वादाची जाणीव करून देत .आम्ही सर्वांनी आठवणीत तुम्हाला जपलंय.. एखादी चांगली गोष्ट झाली की आनंदापेक्षा अजून काहीतरी वेगळं आहे याची  जाणीव होते ते तुम्ही आहात...
 आज आमच्या ह्या बाबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही
कारण बाबा हे असेच असतात आणि ते बाबाच असतात




No comments:

Post a Comment