Monday, 21 August 2017

साठवण
आपल्या समोर असे काही छोटे प्रसंग घडतात  किंवा घडत असतात ... की कायम आठवणींमध्ये राहतात आपोआप... त्यातून खूप काही  साठवण होते की  जी जेंव्हा जेंव्हा आठवू  तेंव्हा अधिकाधिक आनंद च देते
....   मला आठवतय माझी आज्जी ताक घुसळायला घ्यायची तेंव्हा नेमक्या मला श्रीकृष्णाच्या लोण्याच्या गोष्टी दुधाच्या घागरी वगैरे आठवायच्या  आणि लोणी काढायच्या वेळेला मी तिथे  ठाणच मांडायची आणि शिरस्त्याप्रमाणे लोण्याचा गोळा  हातावर मिळायचा
 आज्जी म्हणायची कृष्णच आहे... पण अजून हवय म्हणले की ती सांगायची अग सगळे लोणी आजच संपवलं तर तूप कस कढवणार ... ते पण हवं ना
 माझ्या मनात आपला विचार... आज्जी टीव्ही बघत नाही का फ्रेश आणि हेल्दी तूप विकत आणायचं ना सोप्पंय... पण हा विचार मनातच ठेऊन शहाण्या सारखी ऐकायची मी...
त्यावेळी वाटायचं आपल्याला हे  ताक करायला मिळेल तेंव्हा यथेच्छ ताव मारायचा तुपा बिपाची काळजी करायची  नाही
 काही  वर्षांनी लग्न झालं आणि सासरी पण आजेसासूबाईंना ताक करताना बघून  लहानपणीचा गमतीचा विचार आल्याशिवाय राहिला नाही
हे   ताक करण्याचे काम ह्या आज्याच कसे काय करतात बुवा असो त्याहीवेळी पणतिच्या हातावर कौतुकाने लोणी दिल जायचं ( मी आपले विचार आणि हात आवरता घ्यायची)
मग काही वर्षांनी हे खास ठेवणीतले काम  सासूबाई आणि नंतर माझ्याकडे आले ... घरातल्या हायररकी नुसार सरदार काम माझ्याकडे आल्याचा मला उगाचच जरा आनंद वाटला
... आणि त्याचवेळी आई... लोणी म्हणून लेकीने  हात पुढे केला ... आणि मी ही सहजपणे लोणी तिच्या हातावर ठेवले .. तिचा आनंद बघताना मला एकदम दोन्ही आज्या आठवल्या ... भूमिकांचे हस्तांतरण झाले होते स्वतः न घेता आपल्या दुधावरच्या सायीला लोणी देणारे  हात आठवले ... आणि कळले की  अश्या कित्येक गोष्टींमधून त्या साठवणीचा वसाच देत होत्या
 आजची साठवण उद्यासाठी गुंतवणूक ठरून आयुष्यभरासाठी सुखाचा परतावा देईल ...
 कधी  मन राखून .. कधी भल्यासाठी ते मोडून   आपल्याच सुखाची तजवीज त्या करत असतात
 स्थैर्या साठी ...नात्यांच्या जपणुकीसाठी  ... अखंड सुखाचा परतावा मिळावा म्हणून..
 आजच्या भविष्यासाठी आपण करत असलेल्या धावपळीत जरा थांबून आपण  त्यांच्याही वाटण्याचा विचार केला  तर हा वसा कदाचित आपणही पुढे देऊ शकू ... हो ना
... आरती

Sunday, 16 July 2017

When  u do things as  Ur brain says, Ur heart will be deceived ...n  when u go by Ur heart it may seems to be illogical .... But sometimes it's nice tobe illogical as  it never immitates.....
......😊कधी मी मनातले विचार व्यक्त करतांना English  भाषेतून करेन  असे वाटले नव्हते ... एक तर ही मातृभाषा  नाही त्यामुळे त्यात कदाचित सहजता वाटत नसावी ... किमान मला तरी .. आणि चुकण्याची भीती .....;)पण तरी
 ...अगदी सहज मनात विचार  येतोय आणि लिहितेय ... Just going with my heart..;)...
भावनिक  निर्णयाच्या दिशेने जाऊ इच्छिणारी माणसे आणि   फकत विचारांच्या  दिशेने निर्णय घेण्याला प्राधान्य देणारी माणसे... यांच्याबद्दल... जेंव्हा तुम्ही फकत वैचारिक निर्णय घेता तेंव्हा कदाचित मनातला आवाज दाबून टाकता किंवा त्याला वेगळ्या वाटेवर नेऊन तेच बरोबरआहे ही समजूत करून घेता...
 आणि जेंव्हा भावनिक  प्राधान्याने  निर्णय घेता त्यावेळी ते तर्कशुन्य कधी कधी पूर्णतः असंबद्ध वाटतात पण कधी कधी असे होणंही चांगलं असते. कारण  त्यात दिखावा नसेल.
 थोडक्यात जेंव्हा नक्की काय करायचंय कळत  नाही तेंव्हा मनाने घेतलेले निर्णय receive होतात decieve नाही....
कितीतरी वेळा मनापासून जे वाटत असते अगदी त्याविरुद्ध वागतो आपण ... कधीतरी व्यवहार म्हणून .. कधी चारचौघात तेच योग्य म्हणून... पण असे वागताना हे लक्षातच येत नाही की  अश्या अतिरेकामुळे आपण छोट्या छोट्या गोष्टी करताना ... की ज्या अगदीच साध्या ..कश्यावरही गंभीर वगैरे परिणाम न होणाऱ्या  अश्या गटातल्या आहेत  त्या करताना सुद्धा  आपण ह्याच कसोट्या त्या गोष्टींना लागू करतो...
आपण एकटेच मॉर्निंग वॉक ला जाताना हास्यकलब मधले आवाज येऊन एकटेच हसणे... भर पावसात किती ही इच्छा असेल तरी डबक्यातले पाणी छप्पकन  न उडवता येणं, बुढि के बाल बोटाने ओढून  न खाता कॉटन कॅण्डी नामक तोच पदार्थ काट्याने खाणे,कितीतरी वेळा मस्त तारेवर पक्ष्यांची शाळा भरलेली असताना थांबून बघायची इच्छा असून पण जाऊ दे बाई अस रस्त्यात कुठे बघायचं ...आणि कॅमेरा पण नाहिच्चे तसापण  ....काय पाहतेय म्हणून  बघतील लोक... (हा सध्या फार महत्वाचा मुद्दा),लाल गुलाबी  कलमी  पेरू बघून पटकन तिथेच एक फोड तुला आणि एक फोड मला म्हणून फस्त करणं, ह्यात मराठी कळत  असून मोठ्या मॉल मध्ये ह्याची किंमत  काय असे विचारण्या ऐवजी how much for this? .. असे विचारणे,केवळ शोभणार नाही म्हणून  आवडलेल्या रंगाचा ड्रेस किंवा कपडे  न घेणं...
अश्या कितीतरी गोष्टी ... तुमच्या मनातल्या देखील गोष्टी आपोआप यात भर घालत जातील...
इतक्या साध्या गोष्टी ... का आपण इतकी वाटणं.. आणि बरोबर असणं ह्याची सरमिसळ करतो?करा की कधीतरी मनातले अगदी सहज... फारसे काही बिघडणार नाही... पण तुम्हाला नक्की जाणवेल.... मस्तय हे 😊,,,
बेतालपणाची सीमारेषा न ओलांडता आणि कोणताही दिखावा नसलेलं हे स्वैर वागणे ... आपल्याच आनंदाला receiveकरेल deceive नाही.
अश्या परिपूर्ण मनानेच कदाचित वैचारिक निर्णयांना जास्त स्पष्टता मिळेल.

Sunday, 18 June 2017

आज फादर्स डे ....
  बाबांसाठी.. बाबांबद्दल काय आणि कसे लिहावे... फारसे व्यक्त केलं जातं नाही ते यादिवशी सांगायची संधी आहे
बाबा  म्हणलं की माझ्याच कुटुंबातले जवळून अनुभवता आलेले सगळेच बाबा लोक मला आठवतात .. माझे आजोबा,  माझे बाबा आणि आता माझ्या लेकीचा अरे बाबा..
आज   तुम्ही सगळे अवतीभोवती असल्याने मी भाग्यवान आहे हे  शब्दही माझ्या मनातलं सगळ व्यक्त करायला पूरे पडणार नाहीयेत.
माझे बाबा ..  कर्तबगार,अत्यंत हुशार ,वाचनप्रिय,ओघवते वक्तृत्व, प्रामाणिकपणा,रुबाबदार व्यक्तिमत्व,अजून खूप काही ...  आमच्याबरोबर बऱ्याच लोकांना माहीत असलेल्या ह्या बाजू  ग्रेट आहेतच...
 पण माझ्यासाठी तरी ते घरात आल्यानंतर फकत आमचे बाबा म्हणून  आमच्यासाठी  असायचे   तेच बाबा साहजिकच खूप जास्त जवळचे वाटतात.   .
...बाबा,मी आणि माझी बहिण ...आजसारखं अगदी हायफाईव देण्याइतपत  मोकळेपणा नव्हता ..पण कधीतरी गम्मत म्हणून आईला चिडवण्याच्या कटात सामील होण्याचा मिश्कीलपणा नक्कीच होता.आई  तुला  नाही आमची गम्मत सांगणार असे म्हणले तरी आई कौतुकाने का हसायची ते आज समजतं.
रात्री दमून आले तरी स्कुटर वरून  कॉलनीला फेरी मारणारे, पत्त्यांच्या डावात मुद्दाम हरणारे, खेळतांना  क्रिकेटच्या बॅट चा शॉवर आणि पेपरवेट चा साबण  खरा मानून आंघोळ घालून घेणारे .. खऱ्या पावडरचा शिंपडा झाल्यावर मात्र आईची प्रतिक्रिया  काय येते हे पाहताना हसणारे,शाळेच्या  गॅदरिंग मधला नाच , गर्दीत उभे राहून पाहणारे,सायकल पोहणे शिकवताना .. कडक वागणारे.. नंतर बाईक शिकवताना मागे मागे अक्षरशः पळणारे..  अश्या त्यांच्या कितीतरी  आठवणींमध्ये आजही रमणे छान वाटते
आमचा अभ्यास ,आमच्या आवडीनिवडी, खेळ यामध्ये आमच्या बरोबर नेहेमी असणारे, गोष्टी सांगणारे,बाबा संध्याकाळची रामरक्षा शुभंकरोती म्हणले ना हे ही आठवणीने विचारायचे.  असे म्हणतात की संस्कार केले जात नाहीत ... होतात.. ,असे लहानपणीच  त्यांच्या वागण्यातून आमच्यावर होत गेलेले संस्कारच आहेत की जे आजही एखादी चुकीची गोष्ट करण्यापासून परावृत्त करतात.
संपन्न परिस्थिती असूनही उधळमाधळ न करता राहणं त्यांनी शिकवलं,  योग्य ठिकाणी स्पष्टवक्तेपणा .. पण त्याचवेळी आपल्या लोकांसाठी नमते  घेणं... अश्या एक ना अनेक कितीतरी गोष्टी  त्यांनी शिकवल्या ज्यामुळे आज  अडचणी आल्या  तरी त्या पार करणे सोपे झालंय..
आजही  माझ्या लग्नाला बऱ्यापैकी  वर्ष पूर्ण झाल्यावरही त्यांची  ...  छान झालाय हं सगळं ही  शाबासकी  अजूनपण लहानपणासारखाच आनंद  देते ..आजही अवघड  प्रसंगांमध्ये  महत्वाच्या निर्णयामध्ये मी आहे तू काळजी करू नको म्हणणारे बाबा ... मला मागे वळून पहावासही वाटत नाही इतके त्यांचे असणे गृहीत धरते त्यामुळेच की काय
 त्यांच्या वाढत जाणाऱ्या वयाची जाणीव अजूनही मन मान्य करत नाही...
आज जितके आठवावे तितके कमीच...
आज प्रकर्षाने मला  एक उणीव मात्र नक्कीच भासते ,,ती म्हणजे सासर्यांची... लग्न झाल्यापासून  श्रीकांतची सून का... वा..  राजामाणूस... हे ऐकत आलेय... खूप हौशी, मनमिळाऊ ,दांडगा जनसंपर्क असणारे,दिलदार  होते ...हे सगळे फकत ऐकत आलेय ... सून म्हणून नात्यांचे सगळे पैलु अनुभवले ... पण त्यांचं हे असे  असणे नाही अनुभवता आलं ...
आजही तुमची सून म्हणून  ओळखले जाणे हे  तुमच्या आशीर्वादाची जाणीव करून देत .आम्ही सर्वांनी आठवणीत तुम्हाला जपलंय.. एखादी चांगली गोष्ट झाली की आनंदापेक्षा अजून काहीतरी वेगळं आहे याची  जाणीव होते ते तुम्ही आहात...
 आज आमच्या ह्या बाबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही
कारण बाबा हे असेच असतात आणि ते बाबाच असतात




Wednesday, 7 June 2017

किमया
हो किमयाच ...
खूप प्रश्न पडत होते सध्या सारखेच... उगाचच..काही एकमेकांशी संलग्न ... काही प्रश्न पूर्णपणे वेगळे पण पाठोपाठ  मनात अक्षरशः घुमणारे... नात्यांसबंधी ..  बदलणाऱ्या परिस्थिती संदर्भात...  आणि बरेच वगैरे .. पण असे कसे . का.....असे काही....
पण असा एखादा  क्षण येतो की काहीही न बोलता सगळ्या अगदी वेगवेगळ्या असणाऱ्या प्रश्नांना  एकदम सहज उत्तर मिळून जाते....
ही किमया एक तर निसर्ग करतो न दुसरे म्हणजे सगळ्यात जवळच आपलं नाते...
हूल देऊन कंटाळलेला पाऊस एकदमच पडायला लागला .. मी अगदी सहज  हात  खिडकीतून बाहेर काढून पावसात धरला ... मूड का काय तो जरा ऑफ च होता  ...   पण  बर वाटत होते.... आणि तेवढ्यात मागून माझ्याच हातावर हात ठेवले  माझ्या लेकीने .. माझ्याबरोबर माझ्यासारखच .. पाऊस बघायला ... तिलाही  माझ्यासारखच वाटत होते... बरं ... आणि मी पण असा पाऊस तिच्या बरोबर बघत असल्यामुळे अजून छान... मस्त वाटतंय ना आयुली...
आणि बस्स तिथेच सगळे प्रश्न ... गोंधळ .. सगळं संपले... आणि  अकारण  मनाला आलेली खिन्नता .. होती की नाही अस वाटावे इतक नवीन वाटले ...
माझ्यासारखी असणारी .. माझ्यासाठी असणारी माझ्यासारखच वाटणारी... तू तर अजून पण लहान मुलींसारखच .. माझ्यासारखच तर करतेयस की... हे सांगणारी... चैत्रा ... तिने  चुटकीत सगळे लांब पळवून लावलं.. आई तू जसे देशील तसे मी पुढे देईन ... तू जसे वागशील तसच मी शिकेन .. तू जशी आहेस तशीच मी होईन... असे न बोलता  सांगून टाकले .. जबाबदारीची जाणीव परत झाली...पण त्याचे ओझे वाटले नाही... कारण जरी कुठे दमछाक झालीच तर ... अशीच किमया ती पुन्हा करेल ना...
आज मात्र पाऊस आणि माझी लेक यांनी संगनमताने की काय मला सुखावून टाकले हे खरे... आणि...जादू...  किमया   झाली
...आरती